लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महिलेला शिविगाळ करून मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा साधा कारावास व ११ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल गुन्हा नोंद झाल्यानंतर केवळ पाच दिवसातच दिला.रोहिदास यादव कतलामी (३०) रा. जांभळीटोली ता. धानोरा असे आरोपीचे नाव आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर दारूविक्री करू नये, यासाठी मुक्तीपथ संघटनेच्या महिला सदस्यांनी नोटीस दिली होती. रोहिदास याने तुमचा खून करतो, असे सांगून शिविगाळ केली. या आरोपीविरोधात २५ डिसेंबर २०१८ रोजी २०१८ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवि २९४, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार गजानन सहारे यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपीविरोधात सबळ पुरावा असल्याने गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल झाल्याच्या तारखेपासून अवघ्या पाच दिवसात आरोपीला शिक्षा सुनावली. २९४ कलमान्वये तीन महिन्यांचा साधा कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा, कलम ५०९ अन्वये दोन वर्षांचा साधा कारावास, पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास, कलम ५०६ (२) अन्वये दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.
पाच दिवसात आरोपीला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:15 IST
महिलेला शिविगाळ करून मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा साधा कारावास व ११ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल गुन्हा नोंद झाल्यानंतर केवळ पाच दिवसातच दिला.
पाच दिवसात आरोपीला शिक्षा
ठळक मुद्देदोन वर्षांचा कारावास : गडचिरोली न्यायालयाचा निकाल