दिलीप दहेलकर गडचिरोलीभूमिहीन, शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या नववी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या आम आदमी विमा योजनेच्या नोंदणीला जिल्हा भरात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत एकूण पाच हजार ५२३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून या योजनेच्या शिष्यवृत्तीचे काम ३१ टक्क्यावर पोहोचले आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे सदर शिष्यवृत्तीचे काम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.आम आदमी विमा योजना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविली जाते. भूमीहिन, शेतमजूर, अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर योजना भारतीय आयुर्विमा (एलआयसी) महामंडळामार्फत राबविले जात आहे. विम्याचा २०० रूपयांचा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरते. अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपयांचे संरक्षण लाभार्थीच्या वारसास मिळते. तर एक हात किंवा पाय यांना कायमचे अपंगत्त्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये तसेच दोन्ही हात किंवा पायांना कायमचे अपंगत्त्व आल्यास ७५ हजार रूपयांची नुकसान भरपाई दिली जाते. याशिवाय नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या दोन अपत्यांना दर महिन्याला १०० रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी एकूण १८ हजार लाभार्थी निवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. १ जुलै ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात सदर योजनेचे भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकूण पाच हजार ३७६ विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आले. यापैकी चार हजार १२५ विद्यार्थ्यांचे अर्ज एलआयसीने मंजूर केले आहे.
जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे काम ३१ टक्क्यावर
By admin | Updated: May 24, 2015 02:15 IST