राज्यभरात दारूबंदीचा वणवा पेटविण्याचा निर्धार : चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे आवाहनदिलीप दहेलकर - गडचिरोलीसंत, महात्मे समाज घडवितात, सत्ताधिकारी नाही. दारूविक्रेत्यांचे पुनर्वसन महत्त्वाचे नाही. दारूच्या व्यसनातून उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला वाचविणे आवश्यक आहे. १०० टक्के दारूमुक्तीकरिता कुसंस्कार टाळून भावी पिढी वाचवा, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले.स्वातंत्र्य सेनानी व देशातील ज्येष्ठ गांधीवादी स्व. ठाकूरदास बंग यांच्या द्वितीय स्मृतिदिनी शोधग्राम गडचिरोली येथे ‘मद्यराष्ट्राकडून महाराष्ट्राकडे’ या विषयावर आयोजित दारूमुक्ती परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर गांधीवादी फाऊंडेशनचे अध्यक्ष राधाबहेन भट, नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी माजी सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे, विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस, माजी खा. नरेश पुगलिया, सुमनताई बंग, चेतना विकास संस्थेचे अशोक बंग, विभा गुप्ता, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रभाकर तिक्कस, डॉ. आनंद बंग, श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आ. हिरामण वरखडे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल, पोपटराव पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, शासन व प्रशासनाने दारूमुक्तीच्या कार्यात वाहून घ्यावे. दारूला प्रतिष्ठा देणाऱ्यापासून राज्याला अधिक धोका आहे, दारू पिणाऱ्यापासून नाही. प्रत्यक्ष कृतीतूनच दारूबंदची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते, असेही धर्माधिकारी यावेळी म्हणाले.१०० टक्के दारूमुक्तीसाठी लोक चळवळ आवश्यक आहे. ग्रामसभा हे सर्वोच न्यायालय असल्याने ग्रामसभेला मजबूत करणे गरजेचे आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, शोषणमुक्ती व शासनमुक्ती व्हावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी यावेळी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीबाबत अभिनंदनाचा ठराव प्रत्येक ग्रामसभांनी पारित करावा, दारूमुक्ती करणे हे मोठे कार्य आहे. विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही दारूमुक्तीचा वणवा पसरला पाहिजे, असे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार, कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मोहन हिराबाई हिरालाल, प्रभाकर तिकस, हिरामण वरखडे यांनीही दारूबंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन खोरगडे यांनी केले.दारूमुक्तीतून आदर्श जिल्हे घडवू - सुधीर मुनगंटीवारदारूबंदी व व्यसनमुक्ती ही राष्ट्रसंताची शिकवण आहे. सुजान व सज्जन समाज घडविण्यासाठी दारूबंदी व व्यसनमुक्ती आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी शक्य नाही. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोण व चांगल्या विचाराच्या सज्जन व्यक्तींनी एकत्रित येऊन दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सहकार्य करावे. अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. दारूबंदीतून वर्धा गडचिरोली व चंद्रपूर हे तीन जिल्हे आदर्श घडवू, असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
कुसंस्कार टाळून भावी पिढी वाचवा
By admin | Updated: January 27, 2015 23:32 IST