आरमाेरी : मकर संक्रांतीच्या निमित्ताने वैनगंगा नदीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवारंग संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रमाची परंपरा पार पाडत ‘वैनगंगा स्वच्छता अभियान’अंतर्गत वैनगंगा नदीच्या पात्रात कचरापेटी लावण्यात आली, तसेच या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
वैनगंगा नदीवर मकर संक्रातीला आरमोरी शहर व आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने आंघोळीसाठी येतात. येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी युवारंगने सामाजिक बांधिलकी जोपासत आवश्यक सोईसुविधा निर्माण केल्या. ‘वैनगंगा हमारी माता है, स्वच्छ रखना आता है’ अशा घोषणा करून स्वच्छता जनजागृती करण्यात आली. पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिला भगिनींना कपडे बदलविण्यासाठी मंडप उभारण्यात आले. वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे तुटले असल्याने, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी कठडे तुटलेल्या जागी दोर बांधून तत्काळ स्वरूपात एक सुविधा देण्यात आली, तसेच वैनगंगा नदीच्या पुलावर ‘वाहने हळू चालवा’ अशा प्रकारचे फलक लावण्यात आले. याप्रसंगी युवारंगचे सर्व सदस्य उपस्थित होते.