१२ एकर शेती पाण्याखाली : सगनापूरच्या १४ शेतकऱ्यांचा पत्रपरिषदेत आरोपचामोर्शी : सगनापूर येथील गावतलाव पूर्णत: पाण्याने भरलेला असतांना ९ आॅगस्टला सकाळी ११ वाजता गावातील काही जणांनी स्वत:चे शेत पाण्यात बुडू नये म्हणून कोणतीही तमा न बाळगता तलावाखालील शेत असलेल्या शेतकऱ्यांना धमकी देऊन संगणमताने तलावाची पाळ फोडली, असा आरोप सगनापूर येथील ग्रा. पं. सदस्य एकनाथ लोळे यांच्यासह १४ शेतकऱ्यांनी चामोर्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.सगनापूर येथील गावतलावाची पाळ ग्रामसेवक शेंडे, उपसरपंच कैलास कोडापे, ग्रा. पं. सदस्य चरण पोरटे, गजानन आभारे, सुनिल डोके, किशोर आभारे, निखिल पोरटे, श्रीकांत आभारे, तन्वी कोडापे, माजी सरपंच फुलचंद गेडाम, रोजगार सेवेक विजय मापेवार यांनी शेती बुडू नये म्हणून हेतूपुरस्सर तलावाची पाळ फोडली, मात्र तलावाखालील शेतीचा विचार केला नाही. तलावाची पाळ फोडल्याने बापू बोरकुटे, अनिल आभारे यांची ३ एकर जमीन, श्रावण सेलोटे, चरण सेलोटे अर्धा एकर, एकनाथ लोळे, नामदेव आभारे यांची २ एकर, रघुनाथ बोरकुटे, अशोक आभारे यांची प्रत्येकी १ एकर, नक्टू लोळे, कांताबाई आभारे, दीपिका आभारे, मिराबाई लोळे, सईबाई सेलोटे, यमुना आभारे यांची जमीन पाण्याखाली येऊन पिकाचे नुकसान झाले. यासंदर्भात तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
संगनमताने तलाव फोडले
By admin | Updated: August 16, 2014 23:28 IST