दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:14 AM2021-07-19T10:14:15+5:302021-07-19T10:15:22+5:30

Gadchiroli news दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

Salute to women in Gadchiroli district | दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

दुर्गम भागातल्या आदिवासी महिलांच्या हिंमतीला सलाम

Next
ठळक मुद्देदिवसभर नाव वल्हवून ‘त्या’ करतात कुटुंबाचा उदरनिर्वाह

रमेश मारगोनवार

लोकमत न्यूज नेटवर्क

 गडचिरोली : शहरी भागातील एखादी महिला टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तेव्हा तो कौतुकाचा विषय होतो; पण गडचिरोलीच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर नदीच्या वाहत्या पाण्यात नाव वल्हवत लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेऊन सोडतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागड हे म्हणायला तालुका मुख्यालय असले तरी प्रत्यक्षात एखाद्या लहान गावासारखे आहे. तीन नद्यांच्या तीरावर वसलेल्या भामरागडपासून उत्तरेकडील गावांना जायचे असल्यास पामूलगौतम ही बारमाही वाहणारी नदी पार करावी लागते. पलीकडच्या जारेगुडा, गोलागुडा, दर्भा, दर्भाटोला, बोडंगे, इतलवार या पूर्णपणे आदिवासी लोकवस्तीच्या गावांना जाण्यासाठी नावेतून जाण्याशिवाय पर्याय नाही.

पैलतीरावरच्या गावकऱ्यांना रोजगार, दैनंदिन वस्तू, शेतीपयोगी साहित्य आणि इतर अनेक कामांसाठी भामरागडला यावे लागते. केवळ माणसेच नाही, तर त्यांचे विविध साहित्य, सायकली आणि मोटारसायकलीही छोट्या अरुंद नावेवर चढवून नदी पार केली जाते. ती नाव वल्हवत नदी पार करण्याचे जोखमीचे काम कोणतेही लाइफ जॅकेट न वापरता पुरुषांप्रमाणे गावातील महिलाही लीलया करतात.

दररोज एका कुटुंबाचा नंबर

रोजगाराची साधने मर्यादित असल्यामुळे दिवसभर नाव वल्हवून मिळणाऱ्या तोकड्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कोणतीही व्यावसायिक स्पर्धा न करता नदीच्या पलीकडील जारेगुडा या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आळीपाळीने एक दिवस नाव वल्हवण्याची जबाबदारी येते. त्या दिवशीची कमाई त्या कुटुंबात जाते. बहुतांश कुटुंबांतील पुरुष आणि मुले मासेमारी करत असल्यामुळे पैलतीरावर प्रवासी नेणारी नाव वल्हवण्याची जबाबदारी महिलांवर येते.

पुलाची उभारणी केव्हा?

वर्षानुवर्षे याच पद्धतीने नावेचा वापर होत असल्यामुळे त्या गावातील लोकांना त्याची सवय झाली आहे; पण त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नदीवर पुलाची उभारणी करणे गरजेचे नाही का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या समस्येबद्दल ते आदिवासी कधी कुरबुर करत नाहीत आणि केली तरी त्यांचा आवाज प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही.

Web Title: Salute to women in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला