दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत अमलात आणण्यात आलेली आहे. तथापि, अजूनही अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आयुक्त (आरोग्य सेवा) तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी नवे आदेश काढून बायोमेट्रिक हजेरीच्या नोंदीनुसारच सर्व डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे निर्देश दिले आहेत.
'बायोमेट्रिक' हजेरी पत्रकावर हजेरी दर्शविल्यानुसारच, त्याच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते अदा करण्यात यावे. 'बायोमेट्रिक' हजेरी पत्रकावर हजेरी नसलेल्यांचे वेतन काढणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
प्रणाली होत आहे अपडेटकामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आता ही प्रणाली अपडेट केली जात आहे. ज्या आरोग्य संस्थेत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत, तेथेच जाऊन हजेरी नोंदवायची आहे. त्याचे लोकेशन आणि आधारही संलग्न केले जाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी हजेरी नोंदविल्यास ते समजणार आहे तसेच फेस रीडिंगही होणार आहे. यासाठी एईबीएएस हे अॅप डाऊनलोडची सुविधा केली आहे. सदर अॅप आता अपडेट केले जात असल्याची माहिती आहे.
फेस रीडिंगबाबत प्रशिक्षण कार्यशाळाआरोग्य विभागांतर्गत विविध स्तरावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पोर्टलवरील ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. फेस रीडिंग तसेच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा ७ मार्च २०२५ रोजी आयटी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.
७ तालुक्यांत बायोमेट्रिक अयशस्वीजिल्ह्यातील दक्षिण भागातील अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा व भामरागड तसेच उत्तर भागातील कोरची आणि मध्य भागातील धानोरा या सात तालुक्यांतील पीएचसीमध्ये इंटरनेटअभावी बायोमेट्रिक प्रणाली अयशस्वी झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक नोंदी घेण शक्य नाही.
तर.. वेतनाची रक्कम होणार वसूल१ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक अथवा फेस रीडिंग हजेरीनुसारच अदा करण्यात यावे. त्याव्यतिरीक्त वेतन अदा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित लेखा अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी त्यासाठी जबाबदार राहतील व त्यांच्याकडून संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यास अदा केलेल्या वेतनाची रक्कम वसूल करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही आयुक्त (आरोग्य सेवा) तथा संचालकांनी आदेशात म्हटले आहे.