लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली व भामरागड तालुक्यांत सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची रोहयो मजुरी थकीत आहे. त्यामुळे कष्टकरी हैराण आहेत. यासह ग्रामसभांच्या प्रश्नांवर डावे पक्ष एकवटले आहेत.
एटापल्ली व भामरागड तालुक्यांतील रोजगार हमी मजुरांची २ कोटी ७९ लाख ३५ हजार ३५८ रुपयांची थकीत मजुरी व रोजगार सेवकांचे थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, लाडकी बहीण योजनेपासून एटापल्ली व भामरागड तालुक्यांतील वंचित सर्व लाडक्या बहिणींना तातडीने योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा विविध मागण्या डाव्या पक्षांनी केल्या आहेत. एटापल्ली व भामरागड तालुके पाचव्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट असल्याने ग्रामसभेच्या ठरावाशिवाय लोहखाणी, प्रकल्प सुरू करू नये, अशी मागणी आहे.
आंदोलनाचा प्रशासनाला दिला इशारा
- विविध समस्यांची सोडवणूक होण्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ एप्रिल रोजी एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.
- एटापल्ली वन नाक्यापासून सुरू होणाऱ्या मोर्चात भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव देवराव चवळे, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री वेळदा, माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, अॅड. जगदीश मेश्राम, राज बन्सोड, सचिन मोतकूरवार, सुरज जक्कुलवार, रमेश कवडो, शामसुंदर उराडे सहभागी होणार आहेत.
गट्टा मार्ग दुरुस्त करा
- एप्रिल महिन्यापासून २१०० रुपयांचा लाभ देण्यात यावा. गट्टा ते सुरजागड रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करा. उत्खनन व वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतपिकांची एकरी ५० हजारप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी.
- काही प्रमुख मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाकपमार्फत करण्यात आला आहे.