चामोर्शी : तालुक्यातील रेती, गिट्टी, मुरूम व विटा कंत्राटदारांकडून अवैध उत्खननाच्या नावावर दंडात्मक कारवाई म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंग व तहसीलदार हे लाखो रूपये वसूल करीत असून याबाबत एकही पावती दिली जात नाही. पैसे उकडण्याच्या कामात ट्रॅक्टर मालकांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप तालुक्यातील रेती व विटा कंत्राटदारांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती देतांना लखमापूर बोरी येथील गुरूदेव चापले म्हणाले, ६ मे रोजी पहाटे ५.३0 वाजता एकोळी नदीघाटाजवळ आपली ट्रॅक्टर रिकामी उभी असतांना चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी यांनी ट्रॅक्टरचालक किशोर भोयर यास पोलीस कारवाईची धमकी देऊन ट्रॅक्टर नदीपात्रात लावून फोटो काढले. त्यानंतर आपणास बोलावून १ लाख रूपयाची मागणी केली. आपण पैसे देण्यास नकार दिल्यावरून, परवाना वेळेअगोदर वाहन लावल्याच्या कारणावरून कार्यालयात बोलविले. कार्यालयात पोहोचल्यानंतर नायब तहसीलदार दहीकर यांनी आपणास ३ लाख ८६ हजार रूपयाचा दंड भरून ट्रॅक्टर नेण्यास सांगितले, असेही गुरूदेव चापले यावेळी म्हणाले.यानंतर २0 मे रोजी ९0 हजार रूपये भरण्याबाबतची नोटीस तहसीलदारांमार्फत आपणास बजाविण्यात आली. २२ मे ला मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत किती वाहने पकडली, एकूण दंडात्मक वसूल केलेली रक्कम किती, याबाबतची माहिती पावतीनिहाय माहितीच्या अधिकारात मागितली असल्याचे चापले यांनी यावेळी सांगितले. २३ मे रोजी पुन्हा तहसीलदारांमार्फत नोटीस बजावून २४ मे रोजी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. यावेळी आपण दंडात्मक रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर २ जून रोजी जप्त केलेली ट्रॅक्टर सोडण्यात आल्याचे पत्र आपणास प्राप्त झाले. या पत्रात दंडात्मक रकमेबाबत कुठलाही उल्लेख नव्हता, असेही चापले म्हणाले. सुनिल चलाख, निलकंठ कुनघाडकर, अशोक संतोषवार, पत्रू सोरते या परवानाधारक विटा कंत्राटदारांनीही एसडीओकडून दंडाच्या स्वरूपात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला. तसेच पावती न देता कच्च्या मालावर दंड आकारल्या जात असल्याचा आरोपही विटा कंत्राटदारांनी केला. यावेळी रूपेश चलाख, रवींद्र कुनघाडकर उपस्थित होते. नायब तहसीलदार दहीकर यांच्याशी संपर्क साधला असता, कंत्राटदारांनी आकसापोटी खोटे आरोप केल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
अवैध उत्खननाच्या नावावर लूट
By admin | Updated: June 4, 2014 23:46 IST