पालिकेची दुर्लक्ष : बालू मडावी यांच्यासह नागरिकांचा आरोप गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दित येणाऱ्या गोकुलनगर परिसरातील गणेश नगरात अद्यापही पक्के रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. सदर सुविधा करण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी वार्डाचे नगरसेवक व प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र न.प.ने गणेश नगरात मूलभूत सुविधा निर्माण केल्या नाही. सखल भागाच्या विकासाकडे पालिकेचे पदाधिकारी व न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बालू मडावी यांनी केला आहे. पालिकेचे पदाधिकारी विकसीत भागात गरज नसताना लाखो रूपये खर्च करून नाल्या व रस्ते बांधत आहेत. न.प. पदाधिकारी व प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने गडचिरोली शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप मडावी यांनी केला आहे. पक्के रस्ते व नाल्या नसल्याने गणेश नगरातील नागरिक पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जात आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. महत्त्वाचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी वार्डात येऊन समस्यांची पाहणी केली, मात्र सुविधा केल्या नाही. खोट्या आश्वासनावरच या भागातील नागरिकांची बोळवण सुरू आहे. गणेश नगरात नाल्या बांधून अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकावे, अशी मागणी बालू मडावी व वार्डातील नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गणेश नगरातील रस्त्याची दुरवस्था
By admin | Updated: August 7, 2016 01:45 IST