स्वच्छता मोहीम गतिमान करावी
आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आळा घाला
कुरखेडा : शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बंदी घालणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
घाेट : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा
वैरागड : रस्त्यामुळे गावाचा विकास होतो. मात्र, पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गडचिराेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. या संदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. याकडे दुकानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
वैरागड : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही काेंडवाडे जीर्ण झाले आहेत.
बेरोजगार भत्ता लागू करा
देसाईगंज : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगाराची कुठलीही व्यवस्था संबंधित विभागाने केली नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. शासनाने बेरोजगारांसाठी सुरू केलेली कर्जयोजना मृगजळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था
धानाेरा : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त रस्ते मोहीम राबवून गावखेड्यांतील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.
ओपन स्पेसमुळे दुर्गंधीत होत आहे वाढ
देसाईगंज : न.प. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून, वॉर्डावॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र, या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने तिथे कचरा टाकला जात आहे. दाराला कुलूप नाही. ओपन स्पेस विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.
दूध शीतकरण केंद्र अडगळीत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. सदर केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. मागील काही वर्षांत दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले असून, दूध खरेदी केंद्र व शीतकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
सिरोंचातील बंद पथदिवे बदलवा
सिरोंचा : शहरातील काही वॉर्डातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, या भागातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास आवागमन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बंद पथदिवे तत्काळ बदलावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प
एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. करोडो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे मनोरे उभारण्यात आले. मात्र, सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डांतील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री
आरमाेरी : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. हल्ली उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे.
एटापल्लीतील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागांत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत. या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, सदर खर्च वाया गेला आहे.
मालेवाडा भागातील समस्या सोडवा
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्यसेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.
कोत्तागुडम पुलाचे बांधकाम करा
अहेरी : व्यंकटापूर-अहेरी राज्य महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोत्तागुडाम पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या बांधकामात खंड पडला आहे. व्यंकटापूर परिसरातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या पुलाचे बांधकाम करावे.