घाेट परिसरातील अनेक गावे लहान आहेत. या गावांसाठी पाणीपुरवठा याेजना राबविणे शक्य नसल्याने शासनाने साैरऊर्जेवर चालणाऱ्या पाणी पुरवठा याेजना उभारून दिल्या आहेत. यामध्ये गावातील एखाद्या हातपंपाला माेटारपंप बसविला जातो. हातपंपातील पाणी माेटारीच्या सहायाने जवळच असलेल्या टाकीत टाकले जाते. तेथून एक नळ कनेक्शन दिले जाते. विशेष म्हणजे यासाठी विजेचा खर्च वाचतो. नळ सुरू करून नागरिक पाण्याचा वापर कधीही करू शकतात.
घोटपासून १४ किलोमीटरवर असलेल्या माडेआमगाव येथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या दोन नळ योजना शासनाकडून देण्यात आल्या हाेत्या. वाॅर्ड क्रमांक १ व वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये या याेजना हाेत्या. वाॅर्ड क्रमांक १ मधील नळयोजना पाच वर्षांपूर्वीच बंद पडली, तर वाॅर्ड क्रमांक ३ ची नळ योजना एक वर्षापासून बंद आहे. साैरऊर्जा याेजनेसाठी इलेक्ट्रीक खर्च येत नसला तरी या याेजनेची देखभाल ठेवावी लागते. मात्र, ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने या दाेन्ही याेजना बंद पडल्या आहेत. आता उन्हाळा सुरू झाल्याने गावात पाणी टंचाई निर्माण हाेण्यास सुरूवात झाली आहे. याेजना दुरूस्त कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.