गडचिराेली : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण साेडत गुरुवार, ४ फेब्रुवारी राेजी सर्व तहसील कार्यालयांत काढण्यात येणार हाेती. मात्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात कुठलाही बदल करता येणार नाही, असे सुचविल्यामुळे ही सोडत रद्द करून आरक्षण साेडतीसाठी नव्याने नियोजन करण्यात निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत.
गडचिराेली जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रात दर्शवून जिल्हास्तरावरचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणात तफावत आली आहे. त्यामुळे ४ फेब्रुवारी राेजी आयाेजित जिल्ह्यातील सरपंचपद आरक्षण साेडत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सरपंचपद आरक्षण साेडतीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, याबाबत सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात काेतवाल मुनारीद्वारे प्रसिद्धी करावी व तसा अहवाल कार्यालयात सादर करावा, असे तहसीलदार तथा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
सरपंचपदाची आरक्षण साेडत ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने सरपंचदाच्या खुर्चीवर बसण्याची प्रचंड आशा बाळगून असलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमाेड झाला आहे.