गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे हे फलक हटवण्याची मागणी होत आहे. फलकांमुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. हे फलक हटवण्याची गरज आहे.
पशुवैद्यकीय अधिकारीच नाही
कुरखेडा : तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.
शेकडो जिल्हा परिषद शाळा विजेविना
कमलापूर: थकीत वीजबिलांमुळे महावितरण कंपनीने आतापर्यंत जिल्ह्यातील २५०हून अधिक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विजेशी निगडीत सारेच उपक्रम थंडबस्त्यात आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये कार्यक्रमासाठी दुसरीकडून वीज आणावी लागते.
शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरूस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
चामाेर्शी शहरात अतिक्रमणाची समस्या
चामाेर्शी: शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्याचबरोबर याठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष
एटापल्ली : तालुक्यातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रशासनाकडूनही समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अंगारा येथील टॉवरची रेंज वाढवा
धानोरा : अंगारा येथील मोबाईल टॉवरची रेंज वाढवावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विलास हावडे यांनी केली आहे. अंगारा परिसरात मुस्का, खडकी, नवेझरी, तुलतुली, खांबाडा आदी गावांचा समावेश आहे. परंतु, या गावांमध्ये रेंज पोहोचत नाही. त्यामुळे येथील टॉवरची रेंज वाढवावी, अशी मागणी आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावी लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी होत आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
प्रसुतीगृह निर्मितीचे बांधकाम रखडले
एटापल्ली : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसुतीगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यातील काही उपकेंद्रातील प्रसुतीगृहांचे बांधकाम रखडले आहे. संस्थेंतर्गत प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी या प्रसुतीगृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेविका कमी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथके व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करतात. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दर हजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
प्रवासी निवाऱ्यावर शेडची मागणी
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक जुने प्रवासी निवारे आहेत. वादळामुळे अनेक निवाऱ्यांचे छत उडाले आहे. प्रशासनाने जुन्या प्रवासी निवाऱ्यांवर नव्याने शेड उभारावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याठिकाणी पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.