रांगी : अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रशिक्षण दिल्यास भांडण व तंटे याेग्यप्रकारे साेडविण्यास मदत हाेईल.
तोट्यांअभावी पाणी वाया
वैरागड : येथील नागरिकांकडे नळ आहेत. परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे.
धानाेरात वाढीव खांब देण्याची मागणी
धानोरा : शहरातील वॉर्डांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मागील दहा वर्षांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे.
बंद पथदिवे बदलविण्याची मागणी
सिरोंचा : शहरातील काही वॉर्डातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या भागातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास आवागमन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बंद पथदिवे तत्काळ बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा त्रास हाेत आहे.
तारांमुळे वाढला धोका
आलापल्ली : शहरातील मुख्य परिसर तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच आहे. लाेंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
सिरोंचात डुकरांचा हैदोस
सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दुधाळ गाईंचे वाटप करा
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.
पथदिव्यांअभावी अंधार
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे. परंतु या मागणीकडे पालिकेचे दुर्लक्ष हाेत आहे.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.