ंदेसाईगंज : तत्कालीन चांदा जिल्ह्याचे उपआयुक्त सी. सी. देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने बांबू, कोळसा व डिंकाच्या गंजाचा विकास झाला. त्यामुळे या गंजासमोर देसाई हे नाव समोर जोडून देसाईगंज हे नाव १९३३ साली देण्यात आले होते. याबाबतच्या स्मृती जागृत करणारी कोनशीला देसाईगंज येथे आजही आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर कोनशीलेचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देसाईगंज हे अगदी सुरूवातीपासूनच वनसंपदेने नटलेले गाव होते. या ठिकाणी बांबू, कोळसा, डिंक यांची मोठी बाजारपेठ होती. या वनोपजाच्या खरेदीसाठी हजारो व्यापारी या ठिकाणी येत होते. या गंजाला तत्कालीन चांदा जिल्ह्याचे उपआयुक्त सी. सी. देसाई यांनी ५ नोव्हेंबर १९३३ रोजी भेट दिली. या बाजारपेठेला आणखी चालना देण्यासाठी या ठिकाणावरून रेल्वेलाईन सुरू करावी यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे देसाईगंज चांदा ते देसाईगंज व पुढे गोंदिया हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला. यानंतर येथील बाजारपेठेची आणखी भरभराठ झाली. १९३३ पूर्वी या ठिकाणाला गावाचा दर्जा नव्हता तर हे एक बांबू, कोळसा व डिंकाचे गंज म्हणून प्रसिध्द होते. देसाई यांच्या प्रयत्नामुळे या गंजाला नाव मिळाले व याचा विकाससुध्दा झाला. देसाईगंजच्या नावाबाबतची कोनशीला देसाईगंज येथे बनविण्यात आली आहे. हा एक ऐतिहासीक वारसा असला तरी या कोनशीलेकडे नागरिक व पुरातत्व विभागाचेसुध्दा नुकसान होत आहे. देसाईगंज शहर हे आजच्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात विकसीत शहर, एकमेव रेल्वे स्टेशन असलेले व जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर म्हणून ओळखले जाते. ही ओळख निर्माण करण्याचे श्रेय देसाई यांना जाते. देसाईगंज शहराच्या विकासासाठी एवढे प्रयत्न करणार्या देसाई यांचा नगरवासीयांना पूर्णपणे विसर पडला आहे. याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वर्षातून एखाद्या कार्यक्रमाचे आयोजनसुध्दा केले जात नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. देसाईगंज शहराचा जुना इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आरक्षण १९ मध्ये संग्रहालय तयार करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
उपायुक्त देसाई यांचा स्मृतीस्तंभ अडगळीत
By admin | Updated: May 11, 2014 23:40 IST