३३ रेतीघाटांची विक्री : रेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेतूनगडचिरोली : जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म विभागाने आतापर्यंत दोन टप्प्यात रेतीघाट लिलावाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली. या दोन टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३३ रेतीघाटांची विक्री झाली असून यातून प्रशासनामार्फत शासनाला एकूण ३४ कोटी ५३ लाख ८९ हजार ५०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने सर्वेक्षणाअंती गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६२ रेतीघाट उत्खनन व वाहतुकीसाठी योग्य दाखविण्यात आले. सदर रेतीघाट विक्रीसाठी २७ सप्टेंबर रोजी प्रथम टप्प्यात आॅनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. या लिलाव प्रक्रियेला रेती कंत्राटदाराकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात २८ रेतीघाटांची विक्री झाली. यातून प्रशासनामार्फत शासनाला जवळपास २३ कोटी रूपयांचा महसूल मिळाला. उर्वरित १८ रेतीघाटासाठी २० आॅक्टोबर रोजी आॅनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये पाच रेतीघाटाची विक्री झाली. विक्री करण्यात आलेल्या रेतीघाटांमध्ये आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज, चामोर्शी तालुक्यातील मुधोली तुकूम, सिरोंचा तालुक्यातील चिंतरवेला, मुकडीगुड्डा व मदीकुंठा या पाच रेतीघाटांचा समावेश आहे. सदर पाच रेतीघाट विक्रीतून प्रशासनामार्फत शासनाला एकूण ११ कोटी ५३ लाख ८९ हजार ५०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. आता पुन्हा १३ रेतीघाट अविक्रीत राहिले आहेत. सदर रेतीघाटासाठी नोव्हेंबर महिन्यात जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने आॅनलाईन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला वनसंपत्तीसोबत खनिज संपत्तीचेही मोठे वरदान मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रेतीघाट आहेत. शासकीय इमारती, खासगी इमारत, रस्ते, पूल व इतर बांधकामांसाठी रेतीची मोठी मागणी असते. त्यामुळे कंत्राटदारही रेती उत्खनन व वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी पुढे येतात. आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन रेतीघाटाचे शुल्क अदा केल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने संबंधित कंत्राटदाराला परवाना दिला जातो. त्यानंतर सदर कंत्राटदार टीपीनुसार संबंधित रेती घाटाच्या क्षेत्रात रेतीचे उत्खनन व वाहतुकीचे काम पार पाडतो. रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता दक्ष झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)परवाना नेण्यासाठी कार्यालयात कंत्राटदारांची गर्दीरेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन रेतीघाट खरेदी केलेल्या संबंधित कंत्राटदारांना रेती उत्खनन व वाहतुकीचा परवाना देण्याची कार्यवाही जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. ज्या कंत्राटदारांनी रेतीघाटाच्या किंमतीची रक्कम अदा केली आहे, असे कंत्राटदार रेती उत्खनन व वाहतुकीसाठी परवाना घेण्याकरिता जिल्हा खनिकर्म विभागाच्या कार्यालयात गर्दी करीत असल्याचे गेल्या पाच-सहा दिवसांत दिसून आले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्या लागण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अनेक कंत्राटदार जिल्हा खनिकर्म विभागाच्या कार्यालयात परवाना घेण्यासाठी 0ठाण मांडून बसले होते. येथील कर्मचारीही कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.
३४ कोटींचा महसूल प्राप्त
By admin | Updated: October 30, 2016 00:56 IST