वैरागड : श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन उत्सव देशभर सर्वत्र साजरा केला जातो. मात्र आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे काहार समाजाच्या वतीने मागील १०० वर्षांपासून रक्षाबंधन उत्सव वेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या दुसऱ्या दिवशी वैरागड येथील काहार समाजातील महिला, पुरूष, बालगोपाल एकत्र येतात. गावाच्या मुख्य रस्त्यातून मिरवणूक काढली जाते. मागील १०० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. समाजातील महिला शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या बारीक करून टोपलीत टाकतात. त्या टोपलीमध्ये गव्हाचे दाणे टाकतात व त्यामध्ये गौरी तयार करतात. त्याला ‘भूजली’ असे संबोधले जाते. उत्सवादरम्यान समाजातील महिला, नागरिक नवीन कपडे परिधान करून हातात भूजली घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. हा या समाजाचा मोठा उत्सव मानला जातो. सोबतच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली रक्षाबंधन उत्सवाला माहेरी आल्यानंतर या उत्सवाचा आनंद डोळ्यात साठवून सासरी जातात. सायंकाळी ४ वाजता गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर खोब्रागडी, वैलोचना व नाडवाही या नद्यांच्या त्रीवेणी संगमावर हाताला बांधलेल्या राख्या व महिलांकडे असलेली भूजली यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी या उत्सवाच्या आयोजनासाठी श्रीराम अहीरकर, जयलाल बरवे, भैयालाल पंडेलगोत, होमलाल भरदवार, बालाजी भरदवार आदींसह नागरिकांचा सहकार्य लाभले. (वार्ताहर)
शतक पार केलेले काहार समाजाचे रक्षाबंधन
By admin | Updated: September 1, 2015 01:29 IST