अल्प पावसाचा फटका : जिल्ह्यात ७७ हजार २१५ हेक्टरवर पेरणीचे नियोजनगडचिरोली : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन रोवणीअभावी पडिक ठेवली. पुरेशा पावसाअभावी यंदा जड धान पिकाचा उतारा कमी येणार आहे. आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांची रबी हंगामाकडून आशा वाढली आहे. मात्र रबी हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांची सरासरी १०.२ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदा २०१५-१६ च्या रबी हंगामात एकूण ७७ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, चना, मोहरी, तीळ, सूर्यफूल, करडई, ऊस, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाच्या पेरणीला वेग नसल्याचे दिसून येत आहे. अल्प पावसामुळे नदी नाले, कोरडे पडले असून सिंचन विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे पावसाचे पाणी खुल्या बंधाऱ्यातून निघून गेले. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकरी रबी पिकाची पेरणी करण्यासाठी प्रतीक्षाच करीत आहेत. पेरणी झालेल्या हरभरा, तूर, वाल, ज्वारी, मका आदी रबी पिकांवर विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. वातावरणातही बदलाव होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
रबीची १० टक्के पेरणी
By admin | Updated: November 15, 2015 00:53 IST