अहेरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम २0१३-१४ मध्ये अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत २८ कोटी ७९ लाख ७६ हजार ७८२ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अनेक केंद्रावरील धानाची उचल न करण्यात आल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर धान्य सडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पणन हंगामा अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धान खरेदी करण्यासाठी ३२ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. धान खरेदीसाठी ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूरी प्राप्त झाली होती. त्यानुसार अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणार्या ६ तालुक्यामधून धान खरेदीस प्रारंभ करण्यात आला. अहेरी तालुक्यात ६, मुलचेरा ३, सिरोंचा तालुक्यात ९, भामरागड तालुक्यात ३, एटापल्ली तालुक्यात १0 व चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा केंद्राचा समावेश होता. अहेरी तालुक्यातील उमानूर येथील केंद्रावरून ६३.८0 क्विंटल अ प्रजातीच्या धानाची खरेदी करण्यात आली. या धान खरेदी अंतर्गत शेतकर्यांना ८५ हजार ८११ रूपये प्रदान करण्यात आले. अहेरी तालुक्यात ६ कोटी २३ लाख ३८ हजार ३३४ रूपयांची ४७ हजार ५८४.८१ क्विंटल सर्वसाधारण धानाची खरेदी करण्यात आली. मुलचेरा तालुक्यात २ कोटी ५६ लाख ५0 हजार ९ रूपये किमतीचे १९ हजार ५00 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात ८ कोटी ५३ लाख ४२ हजार ५९७ रूपये किमतीचे ६५ हजार ५२८.७0 क्विंटल धान खरेदी झाले. भामरागड तालुक्यात ३ कोटी २२ लाख ६८ हजार ५७५ रूपये किमतीचे २४ हजार ६३२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यातून ७ कोटी ६0 लाख ६३ हजार २२४ रूपये किमतीचे ५८ हजार ६३ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील मार्कं डा कंसोबा येथील केंद्रावरून ५ कोटी ८१ लाख ४ हजार ४२ रूपये किमतीचे ४ हजार ४३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकंदरीत २८ कोटी ७९ लाख रूपयांची धान खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या धानाची त्वरित उचल करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी धान्य उचल करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनाव्दारे धान्याची उचल केली जात आहे. त्यामुळे यंदा खरेदी करण्यात आलेले धान्य खराब होणार नाही, असे चिन्ह दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
२८ कोटींच्या धानाची खरेदी
By admin | Updated: May 30, 2014 23:45 IST