गडचिरोली : पंचायत समिती गडचिरोली येथे शासकीय सेवाकाळात कार्यरत असताना मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने मालमत्ता जमविल्या प्रकरणी शाखा अभियंता (वर्ग-२) अरविंद बहादुरसिंग चव्हाण यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अरविंद चव्हाण यांच्यावर उत्पन्नापेक्षा २४.६९ टक्के संपत्ती अर्जीत केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. अरविंद चव्हाण याला अटकपूर्व जामीन न्यायालयातून मिळाला असला तरी या प्रकरणाची चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे अधिकारी टेकाम हे करीत आहे. अरविंद चव्हाण याच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लवकरच गडचिरोली जिल्हा परिषदेकडे सादर करणार असल्याची माहिती गडचिरोली येथील एसीबीचे पोलीस निरिक्षक दामदेव मंडलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोरीच्या प्रकरणातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपत्ती शासनजमा करण्याचा निर्णय घेतला. यात गडचिरोली जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण याच्यावर निलंबन कारवाई अटळ आहे.
एसीबी जि.प.कडे देणार अभियंत्याच्या निलंबनाचा प्रस्ताव
By admin | Updated: January 17, 2015 01:33 IST