गडचिरोली : खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी त्याचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज सवलत देण्याची सरकारची योजना आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत बँकासह सहकारी बँकांची कर्जवसुली सध्या थंडबस्त्यात आहे. शेतकरीही १५ मार्चनंतर या कर्जाचा भरणा करून व्याजमाफी सवलतीचा लाभ घेण्याच्या तयारीत राहतो, असे बँकींग क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गडचिरोली जिल्ह्यात सरकार दप्तरी १ हजार १४६ शेतकऱ्याची नोंद आहे. जिल्ह्यात २ लाख हेक्टर शेती ही शेतकरी कसत आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी कर्ज व्याज सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीचा लाभ दिला जातो. शून्य टक्के व्याजदरावर हे कर्ज उपलब्ध केले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सरकारकडून सवलत योजनेची रक्कम खात्यावर जमा होण्याची वाट न पाहता शेतकऱ्याची मुद्दल रक्कम जमा करून घेते. मात्र राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जावर सात टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा करून घेते. त्यानंतर सरकारकडून बँकेला प्राप्त होणारी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते, अशी पध्दतीने आता पीक कर्ज वसुलीचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेषत: बँकाही शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी पथक तयार करायच्या परंतु विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्याने बँकांनी वसुलीच्या प्रणालीतही कमालीचे बदल केले आहे. थकीत वसुली वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावून त्यांना व्याज दराचे स्लॅब समजावून दिले जात आहे. आपण जुने कर्ज भरले तर नवे कर्ज तुम्हाला उपलब्ध होईल, असे सांगून मिळेल तेवढे पैसे घेतले जाते.
शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्यास बँकांसमोर अडचणी
By admin | Updated: January 17, 2015 22:58 IST