जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : व्यसनमुक्त गडचिरोलीसाठी जनजागृती व्हावीगडचिरोली : तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा मोहीमेंतर्गत व्यसनमुक्त गडचिरोलीसाठी संपूर्ण जिल्हाभरात गावपातळीवर समित्यांची स्थापना करून आठवडाभरात जनजागृती करावी तसेच तंबाखू व दारू विक्रीस कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखू, दारूमुक्त मोहीम केवळ गडचिरोली जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय झाला आहे. या व्यसनमुक्त मोहीमेची आढावा बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्चचे प्रमुख डॉ. अभय बंग, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या आदिवासी विभागासह टाटा ट्रस्ट व चातगाव येथील सर्चच्या संयुक्त सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारूमुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे दारू सेवन कमी झाले. मात्र तंबाखू सेवन अधिकच आहे, असे सर्चच्या अहवालात दिसून आले, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त आवश्यकसर्च व शासकीय कार्यालयाच्या समन्वयातून तंबाखू व दारूमुक्तीची चळवळ जिल्ह्यात उभी झाली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी नायक बैठकीत म्हणाले.टाटा ट्रस्ट चार कोटींचा निधी देणारराज्याच्या आदिवासी विकास विभागाने जिल्हा तंबाखू व दारूमुक्त करण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या वर्षाकरिता ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. टाटा ट्रस्ट या त्रिवार्षीक उपक्रमास चार कोटी रूपयांचा निधी देणार आहे, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.
तंबाखू व दारू विक्रीस प्रतिबंध करा
By admin | Updated: June 22, 2016 00:48 IST