दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरात मुख्य रस्त्यावर व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी स्वतंत्र विजेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. पथदिव्यांवरून त्यांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. दिवसा पथदिवे बंद असतात, तेव्हा सीसीटीव्हीला वीज पुरवठा होत नाही.
यावेळेत काही तास ते बॅटरीवर काम करतात. मात्र, बॅटरी काम करणे बंद करते, तेव्हा सीसीटीव्हीसुद्धा काम करणे बंद करतात. सीसीटीव्ही काम करीत नसल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. तसेच चोरट्यांसाठी रान मोकळे झाले आहे.
काय आहे नेमकी समस्या? नगर परिषदेने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, त्यांना स्वतंत्र वीज पुवठा दिला नाही. पथदिव्यांवरूनच वीज पुरवठा केला आहे. दिवसा पथदिवे बंद असतेवेळी पथदिवे बॅटरीवर चालतात. क्षमता संपल्यानंतर सीसीटीव्ही काम करीत नाहीत.
पोलिसांकडे नियंत्रण
- नगर परिषदेने स्वनिधीतून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे.
- सीसीटीव्हीचा उपयोग पोलिस करीत असले तरी त्याची देखभाल करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे.
गुन्हा घडला की सीसीटीव्ही तपासा सीसीटीव्हीमुळे पोलिसांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे. शहरात कोणताही गुन्हा घडला की, सर्वप्रथम सीसीटीव्ही तपासले जातात. सीसीटीव्ही हे शहराचा तिसरा डोळा बनले आहेत.
"सीसीटीव्हीला २४ तास वीज पुरवठा व्हावा, यासाठी स्वतंत्र वीज मीटर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी महावितरणकडे अर्ज केला जाणार आहे. सध्या सीसीटीव्ही पथदिव्यांच्या विजेवर काम करीत आहेत." - चंद्रशेखर भगत, संगणक अभियंता, नगर परिषद, गडचिरोली