कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तालुक्यातील घाटी, गांगुली, मालदुगी परिसरातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्तादेखील नाही.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे.
डास व किटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व किटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र सुरू करा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राजोलीत अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
वन विभागावर वाढला रिक्त पदांचा भार
आलापल्ली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजार पेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
चारचाकींमुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. नगर परिषदेने काही वर्षापूर्वी कठडे लावून बंदी घातली होती.
लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सेविका अल्प
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करतात. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे.
चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा
चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील गावांना लाईनमनच नाही
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे ठरताहेत धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चामोर्शी व आरमोरी मार्गावर काटेरी झुडपे वाढली आहेत.
जिल्ह्यात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ
आरमोरी : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.
स्नेहनगरात जंतूनाशक फवारणी करा
गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वार्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतूनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
शेकडो नागरिक अस्थमा आजाराने ग्रस्त
गडचिरोली : प्रदूषण, धुळीचे कण, धूम्रपान व अनुवंशिक कारणांमुळे उद्भवणारा अस्थमा आजार जीवघेणा ठरू शकतो. मागील एका वर्षात सहा रूग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले होते. दिवसेंदिवस अस्थमा रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.
रायगट्टा पुलावर कठडे लावण्याकडे दुर्लक्ष
अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेत दिव्यांगांची ससेहोलपट
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृध्द व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईच नाही
भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. शेकडाे वाहने विम्याशिवाय धावत आहेत. प्रशासन कारवाईबाबत सुस्त आहे.