गोंधळाची स्थिती : सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटली प्रतिक्रियागडचिरोली : महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडे उमेदवारांचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली जात आहे. यामध्ये राजकीय पक्षनेत्यांनी आपली नीतिमत्ता खुुंटीला टांगुन ठेवल्याचे दिसून येत आहे. याबाबत मतदारांमध्येही प्रचंड चर्चा असून राजकीय पक्षाच्या अशा भूमिकांमुळे मतदार राजा सारेकाही स्तब्धपणे पाहत आहे. आजवर महाराष्ट्रात जवळजवळ पाच ते सहा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच यापेक्षा अधिक निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे लढले. परंतु यावेळी विधानसभेच्या निवडणुका हे प्रमुख चार पक्ष तसेच अन्य पक्षही स्वबळावर लढत आहे. बऱ्याच मतदारासंघांमध्ये राजकीय पक्षांकडे उमेदवारही नाही. काँग्रेससारख्या पक्षाकडे संपूर्ण मतदार संघासाठी उमेदवार भेटून जातील, अशी परिस्थिती आहे. मात्र बहुतांश: राजकीय पक्षांना दुसरीकडून उमेदवार आयात करावे लागत आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावान असलेले कार्यकर्ते या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे गेलेले मतदारांना पाहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे सलग १५ वर्ष सदस्य राहिलेले काँग्रेस पक्षाकडून जि. प. सभापती राहिलेले माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे कट्टर समर्थक केसरी पाटील उसेंडी या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार झाले आहेत. केसरीपाटील उसेंडी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सेनेचा दरवाजा जवळ केला आहे व भगवा दुपट्टा खांद्यावर घेऊन आता ते मतदारांसमोर जाणार आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी राहिलेले नारायण वटी यांचा संपूर्ण परिवार कुरखेडा तालुक्यात काँग्रेसशी निष्ठा वाहिलेला आहे. वटी यांचे सासरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून या भागात सर्वपरिचित आहे. तसेच वटी यांचे भाऊही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आजवर काम करीत आलेले आहे. हेच वटी यावेळी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. वटी यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढविलेले विलास कोडाप यांनी यावेळी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हास्तरावर त्यांनी निरीक्षकांनाही भेटून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र आता ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातच ही परिस्थिती उद्भवली असे नाही. तर राज्यातही असेच सर्वत्र चित्र आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्या एका पक्षाची सेवा करण्यात गेल्या ते लोक आज वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन लढत असल्याचे चित्र सर्वसामान्य मतदारांना दिसत आहे. यांच्यासाठी पक्षनिष्ठाही गहाण झाल्या आहेत.नीतिमत्ताही भ्रष्ट झाली की काय, अशी दुदैवी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता मतदान राजालाच खरा प्रतिनिधी निवडावा लागणार आहे. या घटना घडामोडीत मतदार राजा स्थितप्रज्ञ आहे व तो सारे चित्र अवलोकन करीत आहे. पक्ष बदलणारे तसेच एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदार संघात उभे असलेले एकाच कुटुंबातील उमेदवार हा ही एक चर्चेचा विषय आहे, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे मतदार राजा आपला खरा निकाल या निवडणुकीत देईल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
राजकारण्यांनी नीतिमत्ता विकली
By admin | Updated: September 27, 2014 23:15 IST