गडचिरोली : महाविद्यालयाच्या रेकॉर्डवर बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्ती हडपणाऱ्या रोहित साईराम बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार, कोषाध्यक्ष सुरज बोम्मावार, उपाध्यक्ष राकेश पेद्दुरवार व सचिव विजय कुरेवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ मार्च रोजी जामिन दिला. मात्र आरोपींना सर्वोच्च न्यायालयात दादा मागण्यासाठी एक आठवड्यापर्यंत अटकपूर्व जामिन लागू ठेवण्यात आला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यानंतर बोम्मावार बंधूसह अन्य दोघांच्या अटकेबाबत पोलीस कारवाई करतील, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर शिष्यवृत्ती घोटाळ्यातील ज्या संस्था चालकांचा जामिन गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. त्या फरार आरोपींच्या मागावर पोलिसांनी पथक तैनात केले असून त्यांना ही लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. तसेच बोम्मावार यांच्या गडचिरोली येथील विद्याभारती कॉलेजच्या प्रकरणात ३० मार्च रोजी सुनावणी आहे. तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला संकल्प सिध्दी बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अमित बंदे याने २.५० कोटी रूपये शासनाकडून बनावट कागदपत्राच्या आधारे शिष्यवृत्ती म्हणून उचल केले आहे. त्याच्या संपत्ती जप्त करण्याबाबत पोलीस कारवाई करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकूणच न्यायालयाने जामिन नाकारल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातील तपासाला गती आली असून लवकरच सर्व आरोपी जेरबंद होतील, असे तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.
शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या तपासाला पोलिसांकडून वेग
By admin | Updated: March 29, 2015 01:22 IST