धोडराजला भेट : नागरिकांशी साधला संवादभामरागड : दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना दिवाळी सणाच्या पर्वावर दिलासा देण्यासाठी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित प्रभारी पोलीस अधिकारी चंद्रकांत चौधरी, सीआरपीएफचे कमांडट पाटील व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज गावाला भेट दिली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना कपड्याचे वाटप केले. तसेच जुब्बी गावात जाऊन येथील आदिवासी पुरूष, महिलांशी संवाद साधला. दिवाळी सणानिमित्त शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी आठवडाभराच्या रजा घेऊन स्वगावी जातात. स्वगावी दिवाळीचा सण साजरा करून आनंद घेतात. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील भामरागडसारख्या दुर्गम भागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यंदा दिवाळी सणाच्या सुट्या घेतल्या नाहीत. भामरागड तालुक्यातील धोडराज व जुब्बी गावात आदिवासी नागरिक अद्यापही अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. शिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांना दिवाळी सणाच्या पर्वावर काहीतरी मदत करण्याच्या उद्देशाने आपण दुर्गम गावाला भेटी दिल्या, अशी प्रतिक्रिया भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी लोकमतशी बोलताना दिली. पोलीस वगळता इतर कोणत्याही विभागाचे अधिकारी व कर्मचारी नक्षलग्रस्त दुर्गम गावात जाण्यास धजावत नाही. आदिवासी नागरिकांना दिलासा देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दुर्गम गाव भेटीचा उपक्रम सातत्याने राबवित आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पोलीस अधिकारी दुर्गम गावात पोहोचले
By admin | Updated: November 18, 2015 01:26 IST