भूकेने व्याकूळ होत येथील बाजारपेठेत भटकंती करणाऱ्या वृद्धाची अवस्था लक्षात येताच येथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी त्याची विचारपूस करीत घरगुती मेसमधून जेवनाचा डब्बा आणत त्याच्या भाेजनाची व्यवस्था केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवार व रविवार दोन दिवस शहरात पूर्ण संचारबंदी आहे. येथील बाजारपेठेत दोन दिवसांपासून एक वृद्ध भटकंती करीत असल्याचे येथील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आले. त्यांनी त्याची आस्थेने विचारपूस केल्यावर तो भंडारा जिल्ह्यातील वाकल येथील रहिवासी असून, चुकीने या गावात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले; मात्र संचारबंदीमुळे दोन दिवसांपासून परत जाण्याकरिता कोणतेच वाहन मिळत नसल्याने त्याची भटकंती सुरू हाेती. कोरोनामुळे अनोळखी माणसाला कुणीच जवळ करीत नसल्याने त्याची उपासमार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मानवी दृष्टिकोणातून वाहतूक हवालदार मधुकर बारसागडे, गृहरक्षक दलाचे मच्छीन्द्र जनबंधू, प्रभाकर लाडे, प्रेमराज दोनाडकर यांनी गावातील मेसमधून जेवनाचा डब्बा आणत त्याची व्यवस्था केली. सोमवारला वडसा येथील मालवाहक वाहन येथे आल्यावर त्याला त्या वाहनात बसवत देसाईगंजपर्यंत सोडण्यात आले.