युवकाची प्रकृती गंभीर : देलनवाडी गावातील घटनावैरागड : येथून जवळच असलेल्या देलनवाडी येथील युवकाचे गावातील एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून युवतीला गर्भधारणा झाली. आता हे प्रकरण अंगलट येणार या भीतीने त्याने स्वत:च्या शेतावर कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. देलनवाडी येथील विकास रोहिदास धाईत (२२) या युवकाचे गावातील एका तरूणीसोबत मागील वर्षीपासून अनैतिक संबंध होते. त्यातून तरूणीला गर्भधारणा झाली. या तरूणाने आपल्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा, यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी तंटामुक्त गाव समितीकडे अर्ज केला. देलनवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने ३१ जानेवारी २०१५ ला सभा बोलावून मुलाने आणि कुटुंबीयाने मुलीचा स्वीकार करावा, अशी समज दिली. पण मुलाने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतल्याने शेवटी हे प्रकरण पोलिसात गेले. पोलिसांनी दोनही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतल्यानंतर तंटामुक्त समितीच्या सदस्यांसमोर मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास तयार झाला. देलनवाडी येथील तंटामुक्त समितीने विवाह लावून देण्यासाठी २ फेब्रुवारी २०१५ ला सकाळी १० वाजता ग्रामपंचायतमध्ये सभा बोलाविली. मुलगी व तिचे कुटुंबीय सभेला हजर झाले. पण मुलाचा पत्ता नव्हता. तंटामुक्त समितीकडून आणि त्यांच्या कुटुंबीयाकडून मुलाची शोधाशोध सुरू झाली. सदर युवक आपल्या शेतात किटकनाशक प्राशन करून तडफडत असल्याची बातमी गावात आली. नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन विकास धाईतला देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. या संबंधी तंटामुक्त समितीने आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच घेतले विष
By admin | Updated: February 2, 2015 23:06 IST