कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी-चांदागड या ६ किलोमीटर डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गावर जीव धाेक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार बांधकाम विभागाला निवेदने देऊन सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप परिसरातील नागरिकांनी केला आहे. रस्त्याची दुरूस्ती लवकर न केल्यास आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सोनसरी व चांदागड येथील नागरिक तालुकास्थळी दरराेज विविध कामासाठी जातात. याच मार्गाने त्यांना प्रवास करावा लागताे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिकचा वेळ लागताे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाठीचा कणा व गुडघ्याचे आजार बळावत आहेत. दिवसेंदिवस रस्त्याची दुरवस्था वाढत आहे. त्यामुळे किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात या मार्गावर गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.