भामरागड : तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भामरागड तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भामरागड तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. मागील चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्तीच केली नाही. दोन वर्षापूर्वीच या मार्गावरील डांबर उखडले होते. तेव्हाच या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी बांधकाम विभागाने हुलेर गावाजवळ दोन किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर सदर काम समोर सरकलेच नाही. डागडुजी करण्यात आलेला रस्ता सुद्धा अल्पावधीतच उखडला आहे. नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. सदर निधी दरवर्षीच खर्च झाला असल्याचे दाखविण्यात येते. मात्र दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे आलेला पैसा जातो कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कंत्राटदार संगणमताने रस्त्यांचे बांधकाम न करताच परस्पर पैसे लाटत असावे, असाही आरोप केला जात आहे. नक्षल समस्येला हद्दपार करून दुर्गम भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी दुर्गम भागातील रस्त्यांचे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी भामरागड परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामरागड-कोठी मार्गाची दुर्दशा
By admin | Updated: January 27, 2015 23:33 IST