झाडीपट्टी रंगभूमीवर गेली चार दशके माराेतराव बुल्ले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, बाहुली नाट्य कलावंत तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अशी त्यांची ख्याती हाेती; परंतु त्यांच्या आकस्मिक जाण्याने रंगभूमीत पाेकळी निर्माण झाली. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड हाेती. सुरुवातीला त्यांनी दंडारीत बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील धनेगाव येथे ‘व्यंकोजी वाघ’ या नाटकात भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. बुल्ले यांनी पाैराणिक, ऐतिहासिक व लावणीप्रधान नाटकांमध्ये भूमिका साकारली. अल्प मानधनात त्यांनी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश गावांत जाऊन भूमिका साकारल्या. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी नवनवीन उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे त्यांना २००१ मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासह अन्य पुरस्कारही त्यांना मिळाले हाेते. ४ मे २०२१ रोजी त्यांचा ६२ वा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे प्रातर्विधी आटोपून त्यांनी आपली प्रसिद्ध भूमिका ‘व्यंकोजी वाघ’ नाटकातील संभाषण म्हणून दाखवले व सगळ्यांना हसविले. नंतर जेवण झाल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली व उपचाराकरिता नेत असताना काळाने अचानक झडप घातली व त्यांची प्राणज्योत मालवली. भारदस्त कलावंताचा वाढदिवशीच अंत झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.