भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात.
कव्हरेज खंडित
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाइल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाइलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाइनमनविना
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठ्याची समस्या आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते.
गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा
आरमोरी : बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र, या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागात नागरिकांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात रॉकेलची गरज सर्वाधिक असते.
अपघात वाढले
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बस स्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जातात. मात्र, या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही बस स्थानक नसल्याने अपघात वाढले आहेत.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगाव पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
कव्हरेजअभावी त्रास
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुलचेरात डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
खुटगावात निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहनचालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे. शिवाय, त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फार त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी.
वाहतुकीस अडसर
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डांतील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पशू विभागातील पदे रिक्त
एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांत कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशू विभागातील रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी हाेत आहे.
थ्री-जी सेवा नावापुरतीच
कुरुड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
पथदिवे झाकाेळले
आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत, तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. अतिक्रमण काढल्यास रहदारी सुरळीत हाेईल.