विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा
अहेरी : रस्त्याच्या बाजुने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडे सुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी आहे.
टाकीत साचतेय अशुद्ध पाणी
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
कैकाडी वस्ती साेयी सुविधांपासून वंचित
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वस्तीतील नागरिक नगर पालिकेचे मतदार आहेत.
उघड्यावरील खाद्य पदार्थांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : अनेक तालुका मुख्यालयाच्या उपहार गृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वयोवृध्दांना तीन हजार रूपये पेन्शन द्या
आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृध्द ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर प्रती महिना तीन हजार रूपये वृध्दापकालीन अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित
आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाºया जिल्हाभरातील साजा अंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकºयांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी होत आहे. हस्तलिखित सातबारे बंद केल्याने शेतकºयांना सेतू केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.
रेगडी-कसनसूर मार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा
घोट : रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
धानोरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतांनाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाही. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भूर्दंड सुद्धा साेसावा लागताे.