तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे स्ट्रीट लाइटचे वीज बिल जिल्हा परिषद प्रशासनाने भरणे क्रमप्राप्त असताना ते न भरण्यात आल्याने महावितरणतर्फे ग्रामपंचायतीमध्ये स्ट्रीट लाइटचा विद्युत पुरवठा कापण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील अनेक गावे अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत राहत असल्याने त्यांना या बिलाचा भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे सदर विद्युत बिलाचा जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने महावितरणकडे भरणा करावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पदाधिकारी संघटना, कुरखेडाच्या वतीने पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी, सभापती, उपसभापतींना निवेदन देण्यात आले. पं.स. उपसभापती श्रीराम दुगा यांनी निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी गोठणगावचे उपसरपंच रामभाऊ लांजेवार, गेवर्धाच्या सरपंच सुषमा मडावी, सदस्य रोशन सय्यद, अरततोंडीचे सरपंच विजय तुलावी, गुरनाेलीच्या सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, उपसरपंच वासुदेव बहेटवार, उपसरपंच मंगेश कराडे, हेमंत शिडाम आदी उपस्थित होते.
यावेळी उपसभापती श्रीराम दुगा यांनी भ्रमणध्वनीद्वारे जि.प. आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.