गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील काळीपिवळी वाहनधारक आगारासमोरील प्रवाशांची पळवापळवी करीत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर गडचिरोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना तंबी देऊन सोडले. यामुळे छत्तीसगड राज्यातील अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. गडचिरोली येथील अनेक नागरिक छत्तीसगड राज्यात प्रवास करतात. त्याचबरोबर छत्तीसगड राज्यात जातेवेळी पडणाऱ्या गावांमधील गडचिरोली जिल्ह्यातील गावांमधीलही नागरिक काळीपिवळीनेच जातात. याचा गैरफायदा उचलत छत्तीसगड राज्यातील पाखांदूर येथील काळीपिवळी वाहनधारक पेंढरी मार्गे गडचिरोली असे वाहन चालवित होते. राज्यात बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत खासगी प्रवासी वाहन उभे ठेऊन प्रवाशांची उचल करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. छत्तीसगड राज्यातील वाहनधारकांनी गडचिरोली आगारात दलाल नेमून या दलालांच्या मार्फतीने पाखांदूर व पेंढरीला जाणारे प्रवासी आगाराच्या परिसरातून दुचाकीने बसवून धानोरा मार्गावर नेऊन ठेवत होते. हा प्रकार एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन दुचाकीस्वारांना पकडून गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना तंबी देऊन सोडून दिले. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आगारासमोर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
छत्तीसगडच्या वाहनधारकांकडून प्रवाशांची पळवापळवी
By admin | Updated: March 27, 2015 01:02 IST