गडचिरोली : राज्यपालांच्या अधिसूचनेत समाविष्ट असलेल्या १२ संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडून पेसाअंतर्गत व पेसा क्षेत्राबाहेर काम करण्याबाबतचे विकल्प भरून मागितले जात आहेत. त्यामुळे या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून याचा फटका गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रवर्गाच्या स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी ओबीस कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केली आहे.राज्यपालांनी काढलेल्या ९ जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार पेसाअंतर्गत असलेल्या गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सर्वेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन विकास पर्यवेक्षक, परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, वनरक्षक, कोतवाल ही पदे स्थानिक आदिवासींमधूनच भरण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. याअंतर्गत जिल्हाभरातील या बाराही संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडून पेसाअंतर्गत किंवा पेसा बाहेर या दोनपैकी कोणत्या क्षेत्रात काम करण्यास तयार आहात, याबाबतचे विकल्प भरून मागितले जात आहे. पेसाअंतर्गतच्या गावांमध्ये आदिवासी प्रवर्गाच्याच कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याने गैरआदिवासी कर्मचाऱ्यांची या गावांमधून बदली केली जाणार आहे. आदिवासी प्रवर्गाच्या कर्मचाऱ्याला मात्र मोकळीक देण्यात आली असून तो सदर कर्मचारी जर पेसाअंतर्गतच्या गावांमध्ये काम करण्यास तयार नसेल तर त्याला पेसा क्षेत्राबाहेरच्या गावांमध्ये बदली दिली जाणार आहे. त्यामुळे आदिवासी प्रवर्गाचे कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार स्वत:ची बदली करू शकणार आहेत. गैरआदिवासी कर्मचाऱ्यांची मात्र पेसाअंतर्गतच्या गावांमधून बदली केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
पेसाच्या विकल्पाने कर्मचाऱ्यांमध्ये वाढला गोंधळ
By admin | Updated: May 15, 2015 01:37 IST