लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्हा हिवतापासाठी संवेदशील मानला जातो. मागील वर्षी २०२१ मध्ये जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार १३४ रक्त नमुने घेतले. त्यात १२ हजार ३२६ रुग्णांचे रक्त दूषित आढळून आले तर ८ जणांचा मृत्यू झाला. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व आरोग्य संस्थेत २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर १ ते ३० एप्रिल या कालावधीत हिवताप जन-जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही आहेत लक्षणेहिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार करून घ्यावेत. उपचार न घेतल्यास तसेच अर्धवट उपचार घेतल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. वांरवार ताप येऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.
भविष्यात हिवताप आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य खात्यामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. हिवताप आजारावर मात करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाहीत. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हांला होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हातभार लावतो. - डॉ. कुणाल मोडक,जिल्हा हिवताप अधिकारी