गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत मे २०१३ अंतर्गत करण्यात आलेल्या शिक्षकांच्या अवैध बदल्या रद्द झाल्याने दुर्गम भागात मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकांना शांत भागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. सीईओंच्या बनावट स्वाक्षऱ्या करून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. दलालांना दोन ते तीन लाख रूपये देऊन या शिक्षकांनी चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज शहराच्या सभोवताल बदल्या करवून घेतल्या. या जागांवर अवैध बदली करून घेतलेल्या शिक्षकांची वर्णी लागल्याने मागील सात ते आठ वर्षांपासून दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना शांत भागात काम करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र या बदल्या आता रद्द केल्याने चामोर्शी तालुक्यात ५१, आरमोरी तालुक्यात १४, देसाईगंज १०, अहेरी ३४, गडचिरोली २३, धानोरा ७, मुलचेरा ८, कोरची ७, एटापल्ली ५, भामरागड तालुक्यातील ४ जागा रिक्त होणार आहेत. त्याचबरोबर काही केंद्रप्रमुख, १४ उच्च श्रेणी मुख्याध्यापक व ५ पदवीधर शिक्षकांचे पदे रिक्त होणार आहेत. या जागांवर अवैध पद्धतीने बदली करून काही शिक्षकांनी कब्जा केला होता. बदलीनंतर आता या शिक्षकांची जुन्याच ठिकाणी बदली होणार आहे. त्यामुळे या जागा आता रिकाम्या होणार आहेत. या जागांवर दुर्गम भागात काम करीत असलेल्या शिक्षकांची वर्णी लागणार आहे. बोगस बदल्या रद्द झाल्याने नवीन सेवाज्येष्ठता यादी तयार करावी लागणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील तीन हजार शिक्षकांना मिळणार आहे. (नगर प्रतिनिधी)
दुर्गम भागातील शिक्षकांना शांत भागात बदलीची संधी
By admin | Updated: May 7, 2015 01:14 IST