बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : मुरूमगाव-सावरगाव राज्य महामार्गाची दुरवस्थामुरूमगाव : गडचिरोली-राजनांदगाव या राज्य महामार्गाची मुरूमगाव ते सावरगाव पर्यंत मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून माती पसरली असल्याने सदर मार्ग खडीकरणाचा असावा, असे दिसून येत आहे. गडचिरोली-राजनांदगाव हा मार्ग छत्तीसगड व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा मार्ग आहे. छत्तीसगड राज्यात असलेल्या भिलाई येथे जाण्यासाठी सदर मार्ग सरळ पडत असल्याने महाराष्ट्रातील अनेक ट्रक व तेलंगणा राज्यात जाणारे ट्रेलर याच मार्गाने प्रवास करतात. या मार्गावरून लोखंडाने भरलेल्या जड वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची नियमितपणे डागडुजी करणे आवश्यक आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी सदर मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. डांबराची केवळ अवशेष या मार्गावर शिल्लक राहिले आहेत. या रस्त्याकडे एक नजर टाकल्यास सदर मार्गाचे खडीकरण केले असावे व तो उखडला असावा असे दिसून येते. वाहनाच्या मागे प्रचंड धूळ उडते. या मार्गाच्या बाजुला अनेक लहान-मोठी गावे आहेत. वाहन गेल्यानंतर धूळ उडत असल्याने या धुळीचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतो. मोठ्या वाहनांच्या मागे एखादा दुचाकीस्वार सापडल्यास धुळीचा तडाखा त्यालाही बसतो. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
डांबरी रस्त्याचे उरले केवळ अवशेष
By admin | Updated: November 30, 2015 01:20 IST