एटापल्लीतील घटना : ६० हजारांचे सागवान जप्तएटापल्ली : येथील जिल्हा परिषद शाळेमागे असलेल्या दीक्षाराणी फर्निचर मार्टवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेले ६० हजार रूपयांचे सागवान जप्त केले. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ८ वाजता वन विभागाच्या भामरागड स्थित आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक सचिन कंद यांनी केली.दीक्षाराणी फर्निचर मार्टमध्ये अवैध सागवान साठविले असल्याची गुप्त तक्रार मिळाली होती. त्या आधारे सर्च वारंट घेऊन फर्निचर मार्टवर धाड टाकण्यात आली. वन विभागाच्या तपासादरम्यान फर्निचर मार्टच्या थोडे बाजुला असलेल्या एका कुडाच्या घरातून ७५ नग सागवान पाट्या व गट असे एकूण ६० हजार रूपये किमतीचे सागवान जप्त करण्यात आले. याप्रकरणी दीक्षाराणी फर्निचर मार्टचे प्रोप्रायटर चंदा रामजी घोनमोडे यांचे वडील रामजी घोनमोडे व भाऊ कैलाश घोनमोडे या दोन जणांवर भारतीय वनकायदा १९२७ कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीक्षाराणी फर्निचर मार्ट १० वर्षांपासून सुरू असून यापूर्वीसुध्दा या मार्टवर अनेकदा धाडी घालून अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेले कैलाश घोनमोडे जिल्हा परिषद शाळा तांबडा ता. एटापल्ली येथे शिक्षक आहेत. सदर कारवाईत कसनसूरचे वनपरिक्षेत्राधिकारी एन. जी. झोरे, एटापल्लीचे वनकर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास एटापल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी एस. जी. मडावी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दीक्षाराणी फर्निचर मार्टवर धाड
By admin | Updated: December 18, 2015 01:48 IST