शेतकऱ्यांमध्ये गोंधळ : पावसाळ्यातील पीक बुडीची शासनाची मदतगडचिरोली : मागील वर्षी पावसाळ्यादरम्यान झालेल्या शेतीच्या नुकसानीची मदत तब्बल एक वर्षानंतर मिळायला लागली आहे. मात्र सदर रक्कम दुसऱ्याच्याच खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धानाचे पीक वाहून गेले होते. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना तीन ते चार वेळा धानाचे पऱ्हे भरावे लागले. तेही न उगविल्याने शेतजमीन पडित ठेवण्याची पाळी आली होती. शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा धानाची बिजाई खरेदी करावी लागली. शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असली तरी त्या मानाने उत्पन्नात मात्र घट झाली. पुरामुळे रोवलेले धान वाहून गेले. तर काही शेतकऱ्यांचे धान पीक शेतातच कुजले. या शेतकऱ्यांना तर धान लागवडीचा खर्चही सहन करावा लागला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी समाजाच्या विविधस्तरातून होऊ लागली. शासनाने यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागितली.मदतीची रक्कम एक वर्ष लोटल्यानंतर प्राप्त झाली आहे. मदतीची रक्कम बँक खात्यातच जमा होत असल्याने तलाठ्यांनी शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक मागितले. मात्र तलाठ्यांच्या चुकीमुळे खाते क्रमांक चुकले असून एका शेतकऱ्याची रक्कम दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावावर जमा होणे सुरू झाले आहे. ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात आहे. इतर शेतकऱ्यांची रक्कम जमा झाली असतांना आपली रक्कम का जमा झाली नाही, याबद्दल विचारणा करण्यासाठी शेतकरीवर्ग बँकेत गेला असता, झालेला गोंधळ लक्षात आला. अगोदरच मदतीची रक्कम मिळण्यास अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यातच बँक खात्यांच्या क्रमांकातील गोंधळामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेती हंगामाला सुरूवात झाली आहे. मदतीची रक्कम मिळाली असती तर खते, बी-बियाणे खरेदी करण्यास मदत झाली असती. बँक खात्यातील क्रमांक चुकण्यासाठी तलाठी की बँक कर्मचारी जबाबदार आहेत. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.बहुतांश शेतकरी जमा झालेली रक्कम तत्काळ काढून घेतात. दुसऱ्या शेतकऱ्याची जमा झालेली रक्कमही काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भलत्याच व्यक्तीचा फायदा होत असला तरी ज्या शेतकऱ्याच्या नावाने शासनाने मदत दिली, ज्या शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाले, तो शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहणार आहे. तलाठ्यांच्या अशा कारभारामुळे शेतकरीवर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून तलाठ्यांप्रती संतापाची भावना निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
एकाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात
By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST