आष्टी/चामोर्शी : अनैतिक संबंधातून वाद झाल्याने यात एका इसमाची हत्या झाल्याची घटना २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान मक्केपल्ली चेक नंबर एकच्या जंगल परिसरात घडली. श्रीकांत लक्ष्मण गव्हारे (३०) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, संतोष ठाकूर याचे सुंदरा श्रीकांत गव्हारे (२३) हिच्याशी अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाच्या कारणावरून सुंदरा हिचे पती श्रीकांत लक्ष्मण गव्हारे (३०) यांनी १९ जानेवारी रोजी संतोष ठाकूर यास मारहाण केली. या घटनेचा राग मनात ठेवून २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मक्केपल्ली चेक नंबर एकच्या जंगल परिसरात आरोपी संतोष वामन ठाकूर, वामन तुकारा ठाकूर दोघेही रा. मच्छली यांनी श्रीकांत गव्हारे यास कुऱ्हाड व दांडाच्या सहाय्याने डोक्यावर मारहाण केली. यात श्रीकांत गव्हारे हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी चामोर्शीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात मृतकाची पत्नी सुंदरा गव्हारे हिने चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष ठाकूर, पंकज ठाकूर, वामन ठाकूर या तिघांविरोधात भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक खतेले करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अनैतिक संबंधाच्या वादातून एकाची हत्या
By admin | Updated: January 24, 2015 22:54 IST