वैरागडात पाणीटंचाई : प्रारूप आराखडा तयारवैरागड : आरमोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या वैरागड गावासाठी दुसरी पाणीपुरवठा योजना बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेतून पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे वैरागडवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे ७५ हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी आहे. मात्र या पाण्याच्या टाकीमधील पाणी पुरत नसल्याने दुसरी पाणीटाकी बांधण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी भोयर यांच्या घराजवळ दीड लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. सद्य:स्थितीत दोन्ही टाक्यांमध्ये पाण्याची साठवण केली जात असली तरी पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीचीच आहे. त्यामुळे या योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही. ३० वर्षानंतर गावाच्या लोकसंख्येत तीनपटीने वाढ झाली आहे. त्याचपटीने पाण्याचीही मागणी वाढली आहे. मात्र पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याने पाणी पुरत नाही. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना बांधण्याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर केला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या प्रस्तावाला मंजुरी देऊन गोरजाई डोहावर नवीन पाणीपुरवठा योजा बांधण्यासंदर्भात आराखडा तयार केला. सदर आराखडा ग्रामपंचायतीला सादर करण्यात आला आहे. मात्र अजूनपर्यंत प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. काही वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. (वार्ताहर)
नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव रखडला
By admin | Updated: March 27, 2016 01:39 IST