लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळावेत आणि प्राण वाचावेत यासाठी केंद्र सरकारने कॅशलेस उपचार योजना आणली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या योजनेतून देशभरात वाहन अपघातातील जखमींना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळणार आहेत.
अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार योजना २०२५ नुसार, मान्यताप्राप्त कोणत्याही रुग्णालयात जखमींना दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. अपघात झालेल्या दिवसापासून सात दिवसाच्या उपचाराचे पैसे मिळणार आहेत. ही योजना ५ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी २०२५ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या रुग्णालयांत उपचारमहाराष्ट्रात अपघातातील जखमींना एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील जिल्हा, उपजिल्हा रुग्णालय तसेच काही खाजगी रुग्णालयात अपघातातील जखमींवर दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार होतील.
काय आहे केंद्राची योजना ?कॅशलेस उपचार योजनेचा लाभ घेण्याचे तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे अपघातानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. केंद्र सरकार या सरकारी हॉस्पिटलची यादी जारी करील. दुसरा म्हणजे अपघातानंतर २४ तासांत पोलिसांना कळवावे लागेल. तिसरा म्हणजे जखमींची फाईल तयार होईल. त्यात पोलिस रिपोर्ट तयार होईल.
पहिल्या सात दिवसांत दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचारही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जखमी व्यक्तीला १.५ लाख रुपये दिले जातील. ज्यामुळे अपघाताच्या दिवसापासून पुढील ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातील. जखमींना प्रवेशावेळी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही.