लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेवटच्या टोकावरील गडचिरोलीच्या विकासाला गती देणाऱ्या भंडारा-गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या सुधारित आखणीला मंगळवारी (दि. १६) मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. महामार्गासाठी सुमारे ९३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महामार्गामुळे गडचिरोली- भंडारा हे अंतर २३ किलोमीटरने कमी होईल, अवघ्या सव्वा तासांचे हे अंतर होईल, त्यामुळे नागरिकांचे दळणवळण सुकर होणार आहे. एकूण ९४.२४१ कि.मी. लांबीच्या या महामार्गात दोन टप्पे निश्चित केले आहेत.
१ हजार हेक्टर जमीन अपेक्षित
महामार्गासाठी एकूण १०१३.५८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यामध्ये शासकीय १०० हे., वनजमीन ६०.६२ हे. तर खाजगी ८५२.९६ हेक्टर जमीन समाविष्ट आहे. या जमिनीच्या अधिग्रहणासाठी तब्बल ५३४.४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी संयुक्त मोजणी जवळपास पूर्ण झाली असून, अंतिम टप्प्यात आहे.
भाग-१ : नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गावरील सावरखंडा इंटरचेंज ते कोकणागड (२४.७०५ कि.मी.), ३४३ लेनचा महामार्ग.भाग-२ : बोरगाव इंटरचेंज ते गडचिरोलीकडे जाणारा चंद्रपूर मार्ग (६९.५३६ कि.मी.), २४ २ लेनचा महामार्ग.
या दोन टप्प्यांचा समावेश करून एकूण महामार्गाची लांबी जवळपास २४ कि.मी. होणार आहे. महामार्गाचे काम तीन बांधकाम पॅकेजमध्ये (BG-1, BG-2, BG-3) विभागण्यात आले असून, तिन्ही पॅकेजसाठी कंत्राटदारांनी करार केला आहे.
"भंडारा-गडचिरोली महामार्गामुळे जिल्ह्याचा नागपूर व विदर्भातील इतर भागाशी थेट संपर्क वेगवान होणार आहे. औद्योगिक, व्यापारी व सामाजिक देवाणघेवाणीस चालना मिळणार असून, रोजगारनिर्मितीची संधी वाढेल. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे."- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री व पालकमंत्री