केवळ गडचिरोली जिल्ह्यापुरता निर्णय : ९ व १० आॅगस्ट रोजी आयोजन गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ व २९ जुलै रोजी दुसऱ्या व आठव्या वर्गासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. मात्र याच कालावधीत २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळा नक्षलग्रस्त भागात मोडत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शिक्षण विभागाने सदर चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी लांबनीवर ढकलली आहे. दंडकारण्य क्षेत्रात नक्षल्यांकडून दरवर्षीच २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत नक्षल्यांकडून बंदचे आवाहन केले जाते. त्याचबरोबर झाडे पाडून रस्ता बंद करणे, रस्त्याच्या बाजूला नक्षल बॅनर लावणे, पत्रके टाकणे व त्या माध्यमातून नक्षल चळवळीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या कालावधीत हिंसक कारवायाही केल्या जातात. नक्षल्यांच्या या कृत्यांमुळे कोरची, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमधील नक्षलग्रस्त भागांमध्ये मोडणाऱ्या शाळा बंद ठेवल्या जातात. नक्षल्यांच्या दहशतीमुळे शिक्षकही शाळेमध्ये जाण्याचे धाडस करीत नाही. योगायोगाने शिक्षण विभागाने पायाभूत चाचणी २८ व २९ जुलै रोजी आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेता, याच कालावधीत परीक्षा घेतल्यास सदर परीक्षेला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्याचबरोबर शिक्षण विभागाचा आदेश मानत नक्षल्यांचा विरोध झुगारून परीक्षेचे आयोजन केल्यास त्याचे विपरित परिणामही संबंधित शिक्षकाला भोगावे लागण्याची शक्यता होती. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर नियोजित तारीख रद्द करून सदर चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशामध्ये मात्र काही अपरीहार्य कारणामुळे तारखेत बदल करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. मात्र नक्षल्यांच्या सप्ताहामुळेच सदर चाचणी लांबणीवर टाकली असल्याचे शिक्षक वर्गातून बोलले जात आहे. शिक्षकांच्या दृष्टीनेही हे सोयीचेच झाले आहे. (नगर प्रतिनिधी) प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याचे निर्देश सर्वच शाळांपर्यंत पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका पोहोचल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका गोपनिय व सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश सुध्दा शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे ९ आॅगस्टपर्यंत या प्रश्नपत्रिकांची सुरक्षा शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित विभागाचे शिक्षक यांना करावी लागणार आहे. हे अत्यंत जोखमीचे काम त्यांच्यासाठी राहणार आहे.
नक्षल सप्ताहाचा पायाभूत चाचणीला फटका
By admin | Updated: July 30, 2016 01:47 IST