भामरागड : भामरागड वीज केंद्राअंतर्गत येत असलेल्या कियर गावाचा वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अंधारात राहावे लागत आहे. संतापलेल्या नागरिकांनी वीज कार्यालयावर बुधवारी धडक दिली. कियर गावापासून हलवेर, नारगुंडा, कोठी परिसरात दोन दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कियरजवळ झाडे पडले. त्यामुळे वीज तारा तुटल्या व हा विद्युत पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी झाडे तोडून तार जोडणी करण्यात आली व कोठी परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. कियर गावातील ट्रॉन्सफार्मर जळाल्याने मागील सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. येथील नागरिक वीज कार्यालयात पोहोचले व त्यांनी चौकशी केली असता, नवीन ट्रॉन्सफार्मर आणण्यासाठी वाहन उपलब्ध नाही, वाहन मिळताच ट्रॉन्सफार्मर फिट करण्यात येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी ट्रॉन्सफार्मर नेण्यासाठी वाहन आणा लाईनमन तुमच्यासोबत येऊन ट्रॉन्सफार्मर फिट करून देईल, असे सांगितले. शेवटी खासगी वाहन बोलावून ट्रॉन्सफार्मर कियर गावाकडे पाठविण्यात आले. कदाचित गुरूवारपर्यंत येथील वीज पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी शक्यता आहे. कियर गावातून आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळात पोची कुडयेठी, नामदेव वाचामी, रैनू पुंगाटी, सुरेश बोगामी, सुखदेव वाचामी, मंगरू तेलामी, साधू दुर्वा, संतोष पुंगाटी, विजय मडावी, कन्ना तेलामी, उमेश पुंगाटी, विनोद तेलामी, शंकर कुडयामी, रैनू पिडसे, नरेश बिश्वास, संतोष दुर्वा, योगेश बोगामी, दल्लू बोगामी आदी नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
नारगुंडा प्रकाशले; कियर परिसर सहा दिवसांपासून अंधारात
By admin | Updated: September 3, 2015 00:55 IST