लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगरपालिकेकडून दरवर्षी सर्वसाधारणपणे अडीच कोटी रूपयाचा खर्च नाली सफाई, कचरा संकलन व शहर स्वच्छतेवर केला जातो. दरवर्षी मे महिन्यात नाले व गटारांच्या स्वच्छतेला प्रारंभ केला जातो. परंतु, दरवर्षी मोठा निधी खर्च करूनसुद्धा शहरात ठिकठिकाणी कचरा दिसतोच. पावसाळ्यात अनेक नाल्या व गटारी तुंबलेल्या दिसून येतात. आताही अनेक ठिकाणच्या नाल्या गाळाने भरल्या असून काही ठिकाणी दुर्गंधी सूटत आहे.
शहरातील खोलगट भागात पाणी साचून घरादारांत शिरतो. नाल्या, गटारे साफसफाईसाठी वर्षाला लाखोंचा खर्च करूनही नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. ७० हजार लोकसंख्येचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नगरपालिकेला शहरातील अनेक भागांत स्वच्छता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. ज्या भागात रस्ते व नालीची समस्या आहे, त्या भागातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
१७ लाख रुपयांचा खर्च नगरपालिकेकडून दरवर्षी महिन्याला शहर स्वच्छतेवर केला जातो. रोजंदारी कामदारांकडून स्वच्छता केली जाते. दिमतीला ट्रॅक्टर आहेत.
मोकळ्या भूखंडाने वाढतेय घाणीचे साम्राज्यशहरात अनेक ठिकाणी मोकळे भूखंड असून ते खोलगट भागात आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. शहरातील काही भागांमध्ये 3 नागरिकांनी नाल्यावर बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे दिसून येते. अशा नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ केल्या तरच त्या ठिकाणची घाण व कचरा वाहून जाण्यास मदत मिळते. अन्यथा नाल्या व गटारे तुंबतात.
नालेसफाई कधी होणार ?साधारणपणे दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात नाल्यांची सफाई मोहीम नगरपालिकेकडून हाती घेण्यात येते. ही मोहीम संपूर्ण मे महिना शहरातील विविध भागांत चालू राहते.
नाल्या, रस्ते अरूंद...चनकाईनगर, गोकुळनगरमध्ये नाल्या व रस्ते अरूंद आहेत. त्यातच प्लास्टिक व कचरा नाल्यात टाकला जातो.
"दरवर्षी मे महिन्यात मोठे नालेसफाईचे काम होते. लवकरच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे. नागरिकांनी नाले व गटारांत कचरा टाकू नये. साफसफाईसाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. स्वच्छता कामगारांच्या पथकांमार्फत वॉर्डात नाली सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे."- सुजित खामनकर, अभियंता, आरोग्य विभाग, नगरपरिषद, गडचिरोली.